Our Chairman

  • Home -
  • Our Chairman

Message from Our Chairman

शुभेच्छा संदेश

मा.श्री.संतोष गुरुनाथ जंगम

अध्यक्ष, खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ,खोपोली

विद्यार्थी मित्रहो नमस्कार,


सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात आपल्या संस्थेच्या के.एम.सी. महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या तुम्हा सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींचे मी मनापासून स्वागत करतो. नव्या उत्साहाने, उमेदीने व पुढचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही सर्वांनी शैक्षणिक वाटचालीला सुरुवात केली आहे. त्यासाठी मी तुम्हा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. उच्चशिक्षणाच्या क्षेत्रात गेली ४० वर्ष उल्लेखनीय असे कार्य करणाऱ्या आपल्या के.एम.सी. महाविद्यालयाचा नावलौकिक केवळ रायगड जिल्ह्यातच नाही, तर मुंबई विद्यापीठात आदर्श महाविद्यालय म्हणून ते ओळखले जाते. त्याच महाविद्यालयाचे एक घटक होताना तुम्हा विद्यार्थ्यांना मिळालेल्या उच्च शिक्षणाच्या या संधीचा योग्य तो उपयोग तुम्ही करून घ्यायचा आहे.



सन १९७९ मध्ये तत्कालीन राज्यमंत्री कै.बी.एल. पाटील साहेब यांच्या नेतृत्वाने या महाविद्यालयाची निर्मिती झाली. नगरपरिषदचे तत्कालीन सर्व पदाधिकारी, नगरसेवक, सदस्य, खोपोलीतील प्रतिष्ठित नागरिक यांचे बहुमोल सहकार्य महाविद्यालयाच्या स्थापनेमध्ये झालेले आहे. महाविद्यालयाची आता हळूहळू सुवर्णमहोत्सवाकडे वाटचाल सुरू आहे. आतापर्यंत सर्वच क्षेत्रात महाविद्यालयाने केलेली नेत्रदीपक प्रगती समाधानकारक व आनंद देणारी आहे. दोन वेळा नॅककडून महाविद्यालयाचे मूल्यांकन झालेले आहे. मुंबई विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार आपल्या महाविद्यालयात मिळालेला आहे. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच कला, क्रीडा व संशोधन क्षेत्रात सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश गौरवास्पद असेच आहे. उच्चशिक्षणाच्या क्षेत्रात होत असलेले बदल व संधी लक्षात घेऊन त्यादृष्टीने आपण महाविद्यालयात अनेक नव्या सुधारणा करीत आहोत. ज्ञान आणि माहितीबरोबरच कौशल्याधिष्ठित उपयोजित असे शिक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. नव्या बदलांना सामोरे जाताना उद्याचा सक्षम आणि आदर्श नागरिक येथून घडावा हीच अपेक्षा आहे. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळावी आणि त्यांना रोजगार उपलब्ध होऊन आयुष्यात ते सक्षमपणे उभे राहू शकतील अशा प्रकारचा प्रयत्न आपण करीत आहोत.


कोरोना - कोवीड १९ या जागतिक महामारीचा सर्वच क्षेत्रावर जसा दूरगामी परिणाम झाला, तसे शिक्षणक्षेत्रही त्यातून सुटलेले नाही. देश आणि राज्य पातळीवर सर्वांनी मिळून केलेल्या एकजुटीच्या प्रयत्नाने काही प्रमाणात त्यावर आपण मात केली आहे. सर्वच घटकांनी एकजुटीने कोरोना संकटाशी केलेला सामना सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. भविष्यात अशी नवी-नवी संकटे व आव्हाने सातत्याने येत राहतील, पण तरुणाईने त्याला सक्षमपणे तोंड देण्यासाठी मानसिकदृष्ट्या सतत तयार रहायला हवे. आपण त्यासाठी सजग व सक्षम राहू हा विश्वास आहेच. महाविद्यालयाच्या वाटचालीत संस्थेतील माझे सर्व सहकारी, सदस्य, मार्गदर्शक, नागरिक व पालक तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक - शिक्षकेतर सेवकवृंद आणि विद्यार्थी- विद्यार्थिनी आपण केलेल्या सहकार्याबद्दल मी सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद देतो. नवीन शैक्षणिक वर्षात उत्तम अभ्यास करा. ज्ञानसंपन्न व्हा. तुम्हाला नक्कीच उज्ज्वल भविष्य आहे. धन्यवाद !! शैक्षणिक प्रगतीसाठी व पुढील यशासाठी आम्हा सर्वांकडून मनःपूर्वक शुभेच्छा !!

सही-
( श्री.संतोष गुरुनाथ जंगम )