From Desk of Vice-chairman-CDC
मा. श्री. दिलीप उमेदमल पोरवाल
उपाध्यक्ष, महाविद्यालय विकास समिती,
(CDC) के.एम.सी. महाविद्यालय खोपोली
शुभेच्छा संदेश
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक सुविधा आणि सर्वांगीण विकासाचा संकल्प — के.एम.सी. महाविद्यालय, खोपोली. “उद्याचे सक्षम नागरिक घडविण्याचा विश्वास.”
खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या के.एम.सी.महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ मध्ये प्रवेश घेतलेल्या तुम्हा सर्व विद्यार्थी- विद्यार्थिनींचे स्वागत करताना मला मनापासून आनंद होत आहे. मुंबई विद्यापीठाशी कायम संलग्न असलेल्या आपल्या के.एम.सी. महाविद्यालयास ग्रामीण भागातील एक आदर्श महाविद्यालय बनविण्याचा आपला सर्वांचा प्रयत्न आहे. त्यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री.संतोष जंगम, उपाध्यक्ष श्री.अबुबूकर जळगांवकर, कार्यवाह श्री.किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व संस्थेच्या सर्व संचालक पदाधिकाऱ्यांच्या मदतीने महाविद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपण प्रयत्नशील आहोत.
इ.स.१९७९ मध्ये महाविद्यालयाची सुरुवात झाली आणि टप्प्याटप्प्याने महाविद्यालयाने सर्वच क्षेत्रात उत्तम अशी प्रगती केली आहे. महाविद्यालयाचे ‘नॅक’ कडून (National Assessment and Accreditation Council) तीन वेळा मूल्यांकन झाले आहे. ज्यात आपल्या महाविद्यालयास B+ श्रेणी (Grade) मिळाली आहे, ही अत्यंत गौरवास्पद बाब आहे. याशिवाय मुंबई विद्यापीठाने ‘सर्वोत्कृष्ट महाविद्यालय’ म्हणून आपल्या महाविद्यालयास गौरविलेले आहे. गेल्या शैक्षणिक वर्षापासून BBI, BAF, B.Sc.IT हे नवे शिक्षणक्रम मुंबई विद्यापीठाच्या मान्यतेने आपण सुरू केले आहेत. बदलत्या काळाची व्यावसायिक गरज म्हणून हे कोर्सेस उपयुक्त ठरतील. येत्या काळात आणखी काही नवीन कोर्सेस महाविद्यालयात सुरू करण्याचा मानस आहे.
खोपोली, खालापूर, चौक, कर्जत, नेरळ, वावोशी, मोहपाडा या परिसरातील ग्रामीण भागातून येणाऱ्या सामान्य कुटुंबातल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना उच्च शिक्षणाची संधी मिळावी व नोकरी- व्यवसायात उत्तम करिअर करता यावे, यासाठी महाविद्यालय प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या हेतूने महाविद्यालयात पुरेशा व प्रशस्त वर्गखोल्या, प्रयोगशाळा, ग्रंथालय, अभ्यासिका, जिमखाना इ.च्या माध्यमातून पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने महाविद्यालयाच्या संपूर्ण परिसरात CCTV लावण्यात आले आहेत. येत्या शैक्षणिक वर्षात आणखी वर्गखोल्या व सुसज्य असे ऑडीटोरीयम आपण तयार करतो आहोत.
महाविद्यालयीन शिक्षणाचा हा काळ तुम्हा विद्यार्थ्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी महत्त्वाचा ठरणारा असतो. शिक्षणक्षेत्रात उपयोजित शिक्षणाचा, नव्या तंत्रज्ञानाचा वापर वाढू लागला आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण क्षेत्रात अनेक बदल होत आहेत. गुणात्मकदृष्ट्या आपले महाविद्यालय त्यात कुठेही कमी पडू नये यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. शैक्षणिक व संशोधनाच्या क्षेत्रात महाविद्यालय अग्रक्रमावर आहे. परीक्षेतील गुणवत्तेबरोबरच कला, क्रीडा व संशोधनाच्या क्षेत्रात महाविद्यालयाने आजपर्यंत केलेली प्रगती उल्लेखनीय व गौरवास्पद अशी आहे. महाविद्यालयाचे काही विद्यार्थी मुंबई विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत आलेले आहेत, तर संशोधनाच्या क्षेत्रात विद्यार्थी व प्राध्यापकांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे.
आजच्या काळात शैक्षणिक क्षेत्रात होत असलेल्या बदलांबरोबर जाताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. तुमच्यातून उद्याचा सक्षम व परिपूर्ण विद्यार्थी घडावा, हीच अपेक्षा त्यामागे आहे. महाविद्यालयाची जबाबदारी सांभाळताना संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सदस्य नागरिक, पालक, प्राचार्य, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक - शिक्षकेतर सेवकवृंद व विद्यार्थी- विद्यार्थिनींचे बहुमोल सहकार्य मला लाभते आहे. त्याबद्दल सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद !!. या शैक्षणिक वर्षातील तुमच्या यशस्वी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.!!
श्री. दिलीप उमेदमल पोरबाल
उपाध्यक्ष, महाविद्यालय विकास समिती, (CDC) के.एम.सी. महाविद्यालय खोपोली.